..तर सीएए, एनआरसी विरोधाला तलवारीने उत्तर देऊ : राज ठाकरे

 



मुंबई । प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे, यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देणार असं सांगत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात मोर्चा काढणार्‍यांना इशारा दिला आहे. आज आम्ही मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल. एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा महामोर्चा काढण्यात आला.
मोर्चा आझाद मैदानात पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांनी संबोधित करताना घुसखोरांचं संकट गंभीर प्रश्‍न असल्याचं म्हटलं. माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे, असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
मुस्लिमांनी जे मोर्च काढले त्याचा अर्थच कधी लागला नाही. सीएए किंवा एनआरसी असेल जे जन्मापासून येथे राहत आहेत त्यांना कोण बाहेर काढत होतं. तसं कायद्यातच नाही तर मग तुम्ही कोणाला ताकद दाखवलीत, असा सवाल राज ठाकरे यांनी मोर्चा काढणार्‍यांना यावेळी विचारला.पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकललंच पाहिजे. त्यात तडजोड होऊच शकत नाही. अनेकांना सीएएबद्दल काहीच माहिती नाही. फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर चर्चा करतात आणि मेसेज पुढे पाठवतात. हा 1955 सालचा कायदा आहे. ज्यावेळी देशाची फाळणी झाली त्यानंतर 1955 साली हा कायदा झाला. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आज 2000 मधील परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तान भारतापासून विभक्त झाला होता, चाचपडत होता. पण आज काय परिस्थिती आहे त्या देशांची आणि खासकरुन पाकिस्तानची, अशी विचारणा राज ठाकरेंनी यावेळी केली.
केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली तर भाजपाविरोधी आणि स्तुती केली तर भाजपाच्या बाजूने म्हटलं आहे. याच्या मधे काही आहे की नाही. जेव्हा चुकीचे निर्णय झाले तेव्हा त्यावर टीका केली. पण जेव्हा 370 कलम काढलं तेव्हा अभिनंदन केलं. न्यायालयाकडून राम मंदिराला परवानगी देण्यात आली तेव्हा बाळासाहेब असते तर आनंद झाला असता असं म्हटलं होतं. राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना कऱण्याचं ठरलं तेव्हाही अभिनंदन केलं. त्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती लाभेल. आपण फुकट नाही मेलो असं त्यांना वाटेल, असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.